दहशतवादी संघटनांचे नवे हत्यार; तरुणांना दहशतवादाकडे आकर्षिक करण्यासाठी 'हनी ट्रॅपिंग' सुरु
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

पाकिस्तानच्या (Pakistan) दहशतवादी कारवाया जगभरात सर्वश्रूत आहेत. पाकिस्तान दहशतवाद पसरवत असून त्याला खतपाणी घालण्याचे काम करत आहे. आता पाकिस्तानी दहशतवादी समूहांनी तरुणांना दहशतवादाकडे आकर्षिक करण्यासाठी नवीन युक्ती काढली आहे. यासाठी ते सुंदर महिलांचा मोहऱ्याप्रमाणे वापर करत आहेत. यामुळे जम्मू काश्मीरमधील तरुणांचा शस्त्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आणि दहशतावाद्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी वापर करता येईल. यासाठी दहशतवादी संघटना 'हनी ट्रॅपिंग' ही नवी पद्धत वापरत असल्याचे समोर येत आहे.

या संबंधित माहिती मिळताच सयैद शाजिया नावाच्या एका महिलेला बांदीपोरा येथून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे हे नवे कारनामे जगासमोर आले. अटक केलेल्या महिलेचे फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल साईट्सवर अनेक अकाऊंट असून तिचे अनेक तरुण फॉलोअर्स आहेत.

सुरक्षा एजेंसींद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सयैद शाजिया ही महिला गेल्या 7 महिन्यांपासून 'इंटरनेट प्रोटोकॉल' (आयपी) वर नजर ठेऊन आहे. ही महिला अनेक तरुणांशी चॅटद्वारे बोलून त्यांना भेटण्याची गळ घालत असे. त्याचबरोबर या महिलेबद्दल एक विशेष माहिती समोर आली आहे ती म्हणजे ही महिला शाजिया पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. मात्र या महिलेला धडा शिकविण्यासाठी अधिकाऱ्यांनीही एक डाव रचला होता.

या महिलेला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान तिने दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या इतर महिलांबद्दल माहिती दिली आहे. या सर्व महिलांकडे तरुणांना दहशतवादाकडे आकर्षिक करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

सयैद शाजिया या महिलेला अटक करण्यापूर्वी 17 नोव्हेंबर जम्मू काश्मीर पोलिसांनी आसिया जान (28) या तरुणाला 20 ग्रेनेड घेऊन जाताना पकडले आहे.