Amazon ठरली जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी; भांडवल पाहाल तर डोळे पांढरे होतील
अ‍ॅमेझॉन (Photo Credit: TNW)

world's most valuable private company : सोमवारी शेअर मार्केटमध्ये उसळलेल्या तेजीमुळे, अमेरिकन कंपनी 'अ‍ॅमेझॉन' (Amazon) ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत कंपनी बनली आहे. याआधी हा रेकॉर्ड बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या नावावर होता. मात्र आता अ‍ॅमेझॉनने मायक्रोसॉफ्टलाही मागे टाकले आहे. सध्या 'अ‍ॅमेझॉन'चे बाजारभांडवल 796 अमेरिकी अब्ज डॉलरवर, म्हणजेच 55 हजार 827 अब्ज कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या विक्रमासोबतच, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा विक्रम पुन्हा एकदा अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या नावे झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर्स इतकी सांगितली जात आहे.

शेअर बाजारात पहिल्यांदाच अ‍ॅमेझॉनला हे यश प्राप्त झाले आहे. सोमवारी शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्सनी 3.44 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली होती. आता कंपनीच्या एका समभागाची किंमत 1,629.51 डॉलरवर पोहोचली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देणे, आणि त्यांच्या उपयोगी सेलचे आयोजन करणे यांमुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यात अ‍ॅमेझॉन यशस्वी झाले आहे.

जेफ बेझोस यांनी 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 1994 साली अ‍ॅमेझॉन या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी या कंपनीमार्फत फक्त जुनी पुस्तके विकली जायची, मात्र आत अ‍ॅमेझॉनवर सर्व किराणा पासून ते कपड्यांपर्यंत सर्व गोष्टी विकल्या जातात.