... म्हणून आशिया कपपासून विराट कोहली होता दूर : रवी शास्त्रीचा खुलासा
रवी शास्त्री (Photo Credits: Getty Images)

आशिया कपमध्ये विराट कोहलीला स्थान न मिळाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा होती. मात्र यामागचा नेमका खुलासा नुकताच भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आज केला आहे. गल्फ न्यूजशी बोलताना विराट कोहलीला आरामाची गरज असल्याने त्याला आशिया कप पासून दूर ठेवण्यात आले होते असे रवी शास्त्रींनी सांगितले आहे. आशिया कप स्पर्धेमध्ये भारताने बांग्लादेशवर ३ विकेट्सनी विजय मिळवत आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे.

क्रिकेटच्या मैदानावर रनमशीन म्हणून ओळख असलेला विराट आशिया कपपासून दूर होता. मात्र येत्या ४ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यांमध्ये पुन्हा विराट कोहलीकडे भारतीय संघाचे कर्णधार पद देण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानावर विराटचा उत्साह वाखाण्याजोगा असतो. मात्र सतत क्रिके ट मध्ये गुरफटलेल्या विराटला आरामाची गरज होती. शारीरिक आणि मानसिक आराम अत्यावश्यक होता. आशिया कप पासून दूर राहिल्याने पुन्हा नव्या जोमाने विराट मैदानावर उतरेल अशी अपेक्षा आहे.

आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मा आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट शिखर धवनला वेस्ट इंडिज च्या सामान्यांमधून दूर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी पृथ्‍वी शॉ आणि मयंक अग्रवालने टीममध्ये स्थान मिळवलं आहे. वेगवान गोलंदाजांमध्येही जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमार यांना आराम देऊन उमेश यादव, मोहम्‍मद शमी, शार्दुल ठाकुर आणि मोहम्‍मद सिराज यांचा समावेश करण्यात आला आहे.