IPL 2019 च्या प्रसारणावर पाकिस्तानात बंदी
IPL Trophy | Representative Image | (Photo Credits: File Image)

23 मार्च पासून आयपीएल 2019 (IPL 2019) च्या बाराव्या सीजनला सुरुवात होत आहे. या सीजनमधील पहिला सामना एमएस धोनी (MS Dhoni) याच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि विराट कोहली (Virat Kohli) याच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (Royal Challengers Bangalore) रंगणार आहे. मात्र जगभरात आयपीएलची धूम असताना पाकिस्तानात आयपीएलच्या टेलिकास्टवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद अहमद चौधरी (Fawad Ahmed Chaudhry) यांनी या वृत्ताला दुजोरा देत म्हटले की, "14 फेब्रुवारी, 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यांनंतर भारतीय कंपन्यांनी पीएसएल 2019 (Pakistan Super League 2019) ला आयपीएलमधून बाहेर केले. हे पाकिस्तान सहन करु शकलेलं नाही. "

भारतीय कंपन्या आयएमजी रिलायन्स (IMG Reliance) आणि इंडियन ब्रॉर्डकास्टर डीएसपोर्ट (Indian broadcaster DSport) यांनी पीएसएल 2019 ला मध्यातून बाहेर काढले. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रीदी याने भारतीय कंपन्यांवर टीका करत त्या अनप्रोफेशनल असल्याचे म्हटले होते. VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने

पाकिस्तान सुपर लीग दरम्यान भारतीय कंपन्या आणि सरकारने पाकिस्तान क्रिकेटला ज्याप्रकारे वागणूक दिली त्यानंतर आता पाकिस्तानात आयपीएल 2019 चे सामने प्रसारीत करण्यात येणार नाहीत, असे फवाद अहमद चौधरी यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांशी बोलतना सांगितले. पुढे ते म्हणाले की, खेळ आणि राजकारण वेगळे ठेवण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि त्यामुळेच आम्हाला असे पाऊल उचलावे लागत आहे.

आम्ही राजकारण आणि क्रिकेट वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय किक्रेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आर्मी कॅप्स घालून खेळला. त्याविरुद्ध देखील कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. म्हणून मला असे वाटते की, जर आयपीएलच्या प्रसारणावर पाकिस्तानात बंदी घातली तर आयपीएल आणि भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान होईल. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरपावर निर्माण करत आहोत, असेही चौधरी पुढे म्हणाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आर्मी कॅप्स घालून खेळल्याने भारतीय क्रिकेटर्सने देखील पुलवामा हल्ल्याचे राजकारण केले असल्याचे चौधरी म्हणाले.