ठाणे: प्रियकराच्या मदतीने बायकोने केली पतीची हत्या, मृतदेह हॉस्पीटलमध्ये नेऊन रचला अपघाताचा बनाव
Crime | (Archived, edited, representative images)

एका प्रियकर आणि बायकोने मिळून रचलेल्या गुन्ह्याच्या रहस्यमय कथेचा ठाणे पोलिसांनी (Thane police ) सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने भांडाफोड केला. या प्रकरणाचा घटनाक्रम जेव्हा पुढे आला तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. या घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या बायकोने प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याची गळा दाबून हत्या केली. तसेच, हत्येचा संशय येऊ नये यासाठी या दोघांनी मिळून नवऱ्याचा अपघाती मृत्यू (Accidental Death) झाल्याचा बनाव रचला. तसेच, त्यासाठी कसलेल्या गुन्हेगारांप्रमाणे नाटकही वटवले. पण, पोलिसांनी खाकी वर्दीतला हिसका पुराव्यासह दाखवताच गुन्हा कबूल करण्यावाचून दोघांपुढे पर्यायच राहिला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया नाईक (Priya Naik) (वय 28 वर्षे) आणि महेश कारळे (Mahesh Karale ) (वय 30 वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. तर, गोपी नाईक (Gopi Naik) (वय 30 वर्षे) असे मृत पीडिताचे नाव आहे. गोपी नाईक हा प्रिया नाईक हिचा पती आहे. महेश कारळे हा नेरळ येथे रेल्वे कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे समजते. तर, पीडित गोपी नाईक हा ठाणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता.

दरम्यान, प्रिया आणि महेश यांनी मिळून गोपी नाईक याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर गुन्ह्याचा संशय येऊ नये यासाठी दोघांनी अपघाताचा बनाव रचला. त्यासाठी ते गोपी याचे शव एका इमारतीजवळ घेऊन आले. त्यांनी ते शव तेथे टाकले. तसेच, जवळ एक रिक्षा आणि स्कूटर उभी केली. जेणकरून गोपी याचा मृत्यू अपघातात झाल्याचा भास पाहणाऱ्याला व्हावा. असा या एकूण रचनेमागचा हेतू होता. (हेही वाचा, तृतीयपंथीयांवर दगडफेक आणि शिव्या देत मारहाण करण्याऱ्या तरुणांचा पोलिसांकडून तपास सुरु)

दरम्यान, प्रिया हिने गोपी याचा मृतदेह रिक्षातून रुग्णालया आणला. तसेच, आपल्या पतीचा गंभीर अपघात झाल्याचे सांगितले. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त होता. त्यात स्पष्ट झाले की, मृतदेहाच्या अंगावर इतर ठिकाणीही जखमा आहेत. तसेच, या व्यक्तीचा मृत्यू हा गळा दाबल्याने झाला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी अपघात घडलेल्या ठिकाणी जाऊन तपास केला असता हा संशय अधिक बळावला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता या दोघांच्या कृत्याचा भांडाफोड झाला.