'देशाला मोदीरूपी हिंदू राजा मिळाला असताना अयोध्येत राम आजही वनवासी का?'
(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

देशाला मोदीरूपी हिंदू राजा मिळाला असताना अयोध्येत राम आजही वनवासी का? असा सवाल विचारत, निवडणुका आल्या की, राममंदिराची आठवण होते व निवडणुका संपताच राम पुन्हा कडीकुलपात बंद! हे आता तरी थांबावे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारला लगावला आहे. दरम्यान, जसजशा निवडणुका येत आहेत तसतसा रामाचा जप जोरात सुरू झाला आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी फारच पुढची तारीख दिली. याचदरम्यान स्वतः पंतप्रधान मोदी अयोध्येत जाऊन एखादी सभा घेतील व मंदिरप्रश्नी ‘मन की बात’ व्यक्त करतील, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे. यासोबतच हे सर्व राजकारण कायमचे थांबावे म्हणून राममंदिरासाठी अध्यादेश काढाच व रामाला राजकारणातूनही मुक्त करा असे सांगताना आम्ही 25 नोव्हेंबरला अयोध्येत निघालो आहोत ते याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी, असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.

दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी हिंदू करसेवकांनी बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त केला तेव्हापासून राममंदिराचा विषय अधांतरी लटकत पडला आहे. राममंदिराचा प्रश्न न्यायालय सोडवू शकणार नाही. रामाला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे करून अयोध्येत राममंदिर उभे राहणार नाही. न्यायालयाचे निर्णय हे अनेकदा लोकभावना आणि श्रद्धापरंपरा यांच्याच विरुद्ध असतात. बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त कसा झाला याचा शोध घेण्यासाठी सरकारने सीबीआय स्पेशल कोर्ट सुरू केले व ज्यांनी रामाचा वनवास संपविण्यासाठी बाबरी पाडली ते सर्व सज्जन सीबीआय कोर्टात आरोपी म्हणून आजही उभे आहेत. बाबरी पाडणाऱ्यांना आरोपी करून तुम्ही राममंदिर कसे बांधणार? मुळात न्यायालयाचे असे निर्णय मानू नयेत असे भाजप नेत्यांचे म्हणणे असेल तर बाबरी प्रकरणाची चौकशी करणारे कोर्ट अद्याप का ठेवले आहे? श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे व ते अयोध्येतच व्हावे असे मोदी यांना वाटत असेल तर न्यायालय व सगळ्यांच्या सहकार्याची तिकडमबाजी सोडून सरळ एक अध्यादेश काढायला हवा. आता यावर ‘‘अध्यादेश काढणे हे इतके सोपे आहे काय?’’ असे विचारले जात आहे; पण याआधी असे अध्यादेश निघाले नाहीत काय? हा आमचा प्रश्न आहे.असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी ही मते व्यक्त केली आहे. (हेही वाचा, विहिंपकडून ७० ट्रक दगडांची ऑर्डर; अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या हालचालींना वेग)

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका विधानाचा दाखला देत ठाकरे यांनी मोदींना राम मंदिरावरुन टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक चांगले विधान केले आहे. ‘‘जम्मू-कश्मीरमध्ये जेव्हा हिंदू राजा होता तोपर्यंत तेथील हिंदू सुरक्षित होते. शीख बांधवही सुरक्षित होते. मात्र हिंदू राजवटीचा ऱहास होऊ लागला आणि कश्मीरात हिंदूंचाही ऱहास झाला.’’ योगीजींचे हे विधान चमत्कारिक आहे. त्यांची भावना व तळमळ आम्ही समजू शकतो, पण कश्मीर हे तेव्हा स्वतंत्र संस्थान किंवा राज्य होते व आज ते हिंदुस्थानचे घटक राज्य आहे. त्यामुळे कश्मीरातील हिंदूंचे रक्षण करण्याची जबाबदारी सध्याच्या हिंदू राजाची म्हणजे पंतप्रधान मोदी यांचीच आहे. देशाला मोदीरूपी हिंदू राजा मिळाला असताना अयोध्येत राम आजही वनवासी का?, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.