Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार यांच्या पराभवाची कारणे; राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का
Parth Ajit Pawar | (Photo Credit : Facebook)

Lok Sabha Election Results 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार पार्थ पवार (Parth Pawar) यांचा मावळ मतदारसंघातून राजकीय पदार्पणातच दणदणीत पराभव झाला. शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress party) आणि खास करुन पवार कुटुंबीयांसाठी मोठा धक्का असेल. हा पराभव पवार कुटुंबीयांनी कसाही घेतला तरी, विरोधक त्याचे भांडवल करतील हे नक्की. कारण, भारतीय राजकारणातील जाणकार, अभ्यासू आणि राजकीय नेते अशी ओळख असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव असे बरेच वलय पार्थ पवार यांच्या नावामागे होते. दरम्यान, पार्थ पवार यांचा पराभव झाला. या पराभवांच्या कारणावर टाकलेला हा एक कटाक्ष.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतारसंघात दौरे सुरुही केले. तसे, ते उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या मतदारसंगात संपर्क ठेऊन होते. पार्थ पवार यांच्या नावाला घराणेशाहीचे वलय होते. त्यांच्या घराण्याचा राजकारणातील दबदबा पाहता मावळ लोकसभा मतारसंघातून ते मैदान मारतील असे कोणालाही वाटणे स्वाभाविक होते. काही प्रमाणात त्यात तथ्यही होते. परंतू, हे पूर्ण सत्य नाव्हते. या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणण्यास पार्थ पवार यांच्यासमोरही काही आव्हाने होती. या आव्हानांचा यशस्वी सामना करुन ती पेलने त्यांना जमले नाही. त्यामुळे अडचणीत येऊन पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव झाला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि राजकीय स्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि पक्षीय बलाबल
विधानसभा मतदारसंघ राजकीय पक्ष आमदाराचे नाव
पनवेल  (188) भाजप प्रशांत ठाकूर
कर्जत (189) राष्ट्रवादी काँग्रेस सुरेश लाड
उरण (190) मनोहर भोईर शिवसेना
मावळ (204) संजय भेगडे भाजप
चिंचवड (205) लक्ष्मन जगताप भाजप
पिंपरी (206) ऍड. गौतम चाबुकस्वार शिवसेना

वरील एकूण स्थिती पाहता सहज लक्षात येते की, मतदारसंघावर शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व आहे. एकट्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील सुरेश लाड यांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व (5) विधासभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत. त्यामुळे पार्थ पवार यांना तळागाळातून सुरुवात करणे गरजेचे होते. पण, त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार लढत असलेली मावळची जागा जिंकू असे आम्हाला कधीच वाटले नव्हते: शरद पवार)

पार्थ पवार यांना कोणाचे आव्हान?

2014 लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना झालेल्या मतदानाची आकडेवारी
राजकीय पक्ष उमेदवार मिळालेली एकूण मते
शिवसेना श्रीरंग बारणे तब्बल ५ लाख १२ हजार २२६
अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप ३ लाख ५४ हजार ८२९
राष्ट्रवादी काँग्रेस राहुल नार्वेकर ---

 

श्रीरंग बारणे हे या मतदारसंघातून खासदार होते. 2019 मध्ये शिवसेनेने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. 2014 च्या निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकता त्या वेळी अपक्ष असलेले लक्ष्मण जगताप (सध्या भाजपचे विद्यमान आमदार) पार्थ पवार यांना जोरदार टक्कर देऊ शकतील अशी चर्चा होती. मात्र, जगताप हेच आता शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने होते. त्यामुळे मतांची आघाडी तोडणे पार्थ पवार यांच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती.

 

मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिक स्थान

मावळ लोकसभा मतदारसंघाचे भौगोलिक स्थान ध्यानात घेता. एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी तिन मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातील (पनवेल, उरण, कर्जत) तर उर्वरीत तीन विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातील (मावळ, पिंपरी, चिंचवड) आहेत. पुण्यात राष्ट्रवादी तर, रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) प्रभावी आहे. शेकाप हा सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आहे. परंतू, शेकापचे एक वैशिष्ट्य असे की, शेकापची रायगड जिल्ह्यात पक्षबांधणी मजबूत आहे. जर उमेदवार शेकापचा असेल तर या पक्षाचा कार्यकर्ता आणि समर्थक मतदार त्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करतो. मात्र, उमेदवार जर आघाडी करुन आलेला असेल, दुसऱ्या पक्षाचा असेल तर असे एकगठ्ठा मतदान होतेच असे नाही, असे राजकीय अभ्यासक सांगतात. त्यामुळे या मतदारांची एकत्र मोट बांधण्याचेही आव्हान पार्थ पवार यांना सांभाळावे लागले. ही एकगठ्ठा मतं पवार यांना प्रत्यक्षात मिळाली काय? याबाबचा तपशील लवकरच समोर येईल.

राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका

या मतदारसंघाती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. मात्र, नेत्यांमधील पक्षांतर्गत संघर्ष आणि मतभेत यामुळे विविध गट-तट निर्माण झाले आहेत. अशा वेळी पक्षांतर्गत वाद आणि गटतट मोडून काढत सर्वांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान पार्थ पवार यांच्यासमोर होते. अर्थात अशी गटबाजी सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळते. पण, पवार यांना श्रीरंग बारणे यांच्या तुलनेत मिळालेली मते विचारात घेता ही गटबाजी संपवण्यात पवार यांना यश आले असे म्हणता येणार नाही.

घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर काय?

वरील सर्व मुद्द्यांपैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्थ पवार यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होणार हे ऊघड होते. हा आरोप वास्तवतेवर आधारलेला असल्यामुळे पवार यांना हा मुद्दा काळजीपूर्वक हाताळावा लागणार होता. तो त्यांना म्हणावा तसा हाताळता आला नाही. कारण, शरद पवार, सुप्रिया पवार, अजित पवार, रोहित पवार ही घरातील मंडळी आगोदरच राजकारणात असल्यामुळे पुन्हा एकदा आणखी एका पवार कुटुंबातील सदस्याला मतदान का करायचे ? हा सवाल विरोधकांसह जनतेच्याही मनात होता.

पार्थ पवार यांचे वक्तृत्व

पार्थ पवार यांचे वक्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक ठरला. इतक्या मोठ्या राजकीय घराण्याचे वलय असतान त्यांना चार शब्दही प्रभवीपणे बोलता येऊ नयेत ही मोठी आश्चर्याची गोष्ट होती. पहिलेच भाष केवळ फेलच नव्हे तर पर्थ पवार यांच्या एकूण विचारप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले. त्यातून महाराष्ट्राचा पप्पू अशी त्यांची प्रतिमा बनवली गेली.

पार्थ पवारांच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख आणि सहज ध्यानात येणारी काही महत्त्वाची अशीही वर दिलेली कारणं आहेत. त्यात अधिकची भरही घालता येऊ शकते.