लोकसभा निवडणूक 2019: काँग्रेसच्या हाताला राष्ट्रवादीचे घड्याळ? आगोदर 48 जागांची चाचपणी मग महाआघाडीचा खेळ
राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

लोकसभा निवडणूक 2019: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 2014ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या चौखुर उधळलेल्या वारुला चाप लावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात जोरदार रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी उभय पक्षांनी आघाडी करुन इतर छोट्या पक्षांनाही सोबत घेत महाआघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, हे सर्व सुरु असताना यात वास्तव किती आणि स्वप्नरंजन किती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, भाजप विरोधात महाआघाडीची आखणी केली जात असली तरी, प्रत्यक्षात मात्र राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आढावा घेणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी ४८ लोकसभा मतदार संघांचा स्वतंत्र आढावा घेणार अशी चर्चा सुरु होताच काँग्रेसही सावध पवित्र्यात गेल्याचे समजते. कारण, २०१४चा इतिहास पाहता शिवसेना-भाजप युतीचे गाडे पुढे सरकत नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही आघाडीची चर्चा सुरु होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढला. त्याबाबतचे पत्र राज्यपालांना दिले. परिणामी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे जाऊन काँग्रेस, राष्ट्रवादीने निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. हा इतिहास राज्यातील राजकीय वर्तुळाला ज्ञात आहे. दरम्यान, राफेल प्रकरणावरुन विरोधकांनी देशभरात रान पेटवले असताना रष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेली टीप्पणी. त्यावरुन देशभरात विरोधकांच्या मनात तयार झालेला संभ्रम आदी गोष्टी पाहाता काँग्रेस प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत असल्याचे चित्र आहे. (हेही वाचा, आता इथून पुढे निवडणूक नाही : शरद पवार)

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची २०१४ नंतरची राज्यातील सध्यास्थिती पाहता लोकसभेवर काँग्रेसचे २ तर राष्ट्रवादीचे ५ खासदार आहेत. तर, विधानसभेत काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद काहीशी अधिक आहे. त्यामुळे सत्तावाटपात ५०-५० असा फॉर्म्युला राष्ट्रवादीने काँग्रेससमोर ठेवला आहे. त्यातच पुणे, यवतमाळ, औरंगाबाद या काँग्रेसच्या हक्काच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसाल हा फॉर्म्युला किती मान्य होणार हाही प्रश्नच आहे. त्यामुळे 'लोकसभा निवडणूक 2019: काँग्रेसच्या हाताला राष्ट्रवादीचे घड्याळ? आगोदर 48 जागांची चाचपणी मग महाआघाडीचा खेळ', असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.