महाराष्ट्रात 28 ते 30 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून येतील: जयंत पाटील
Jayant Patil | (Photo Credit : Twitter)

Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाराष्ट्रात 28 ते 30 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. जयंत पाटील यांनी आपल्या साकराळे या गावी मंगळवारी (23 एप्रिल 2019) मतदान केले. मतदान केल्यानंतर जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी पाटील यांच्यासोबत मतदानासाठी त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव उपस्थित होते.

हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार राजू शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली येथील उमेदवार विशाल पाटील यांनी पद्माळे या आपल्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच अहमदनगर येथून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील, पुणे येथून भाजप शिवसेना उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस उमेदवार मोहन जोशी, सातारा येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उदयनराजे भोसले, शिवसेना-भाजप उमेदवार नरेंद्र पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, मोहन आगाशे, अमोल पालेकर, गायत्री दातार, मुग्धा गोडसे, गौतमी देशपांडे, सुयश टिळक यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. जगण्याचं साधन मिळालं की, जगल्यावर काय करायचं हे लोकांना बरोबर कळतं अशी प्रतिक्रिया मोहन आगाशे यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केली. अभिनेता सुयश टिळक यानेही आपल्या मतात मोठी ताकद आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करायला हवे, असे अवाहनही सुयश टीळक याने यावेळी व्यक्त केले. (हेही वाचा, मुख्यमंत्री व्हायला आवडेल, आगोदर लोकसभेचं होऊ द्या मग विधानसभेचं सांगतो: अजित पवार)

देशाबरोबर महाराष्ट्रातही दिग्गज राजकीय मंडळींच्या भविष्याचा फैसला मतदार करणार आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नीलेश राणे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, राजू शेट्टी, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.