पुणे: कंडोम वापरता? आता पिशवीही वापरा! विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश
Condom Disposal | (Photo courtesy: archived, edited, representative image)

लैंगिक संबंध (Sexual Relations) ठेवताना तुम्ही कंडोम वापरता? याचे उत्तर होय असेल तर, अशा मंडळींसाठी लगेच पुढचा प्रश्न आहे. कंडोम वापरुन झाल्यावर तुम्ही त्याचे पुढे काय करता? अर्थातच आपल्यापैकी बहुतांशजन उत्तर देतील कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो!. नाहीतरी सुरक्षित लैंगिक संबध ठेवण्यासाठी आणि गर्भनिरोधक (Contraception) म्हणून इतक्याच कारणासाठी आपण तो वापरत असतो. पण, कंडोमचा वापर झाल्यावर तो कचऱ्याच्या डब्यात किंवा उघड्यावर इतरत्र फेकून देण्याच्या याच मुद्द्यावर पुण्यातील विद्यार्थ्यांनी चक्क लढा सुरु केला आहे. विशेष म्हणजे या लढ्यालाही यश येताना दिसत असून, काही कंडोम उत्पादक कंपन्यांनीही मोठा बदल केला आहे. हा बदल म्हणूनच कंडोमच्या पाकिटासोबत आता एक प्लॅस्टीकची छोटी पिशवीही देण्यात येत आहे.

वापरलेल्या कंडोमची योग्य पद्धतीने विल्हेवाट (Condom Disposal) न लावता ते उघड्यावर, किंवा कचऱ्यात टाकले जातात. त्यामुळे सामाजिक आरोग्यास धोका होण्याची मोठी शक्यता असते. कंडोमच्या अशा वापराला चाप लावावा या मागणीसाठी पुण्यातील विधी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करुन घेत न्यायाधिकरणाने या प्रकरणावर सुनावणी घेण्याचाही निर्णय घेतला. दरम्यान, या सुनावणीसाठी सर्व कंडोम उत्पादक कंपन्यांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वन मंत्रालय, जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग आणि शहरी विकास मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना न्यायाधिकरणापुढे उपस्थित असे आदेश देण्यात आले. पुढे पुण्यातील या न्यायाधिकरणाचे कामकाज बंद झाले. त्यामुळे या याचिकेवर अंतिम तोडगा निघू शकला नाही. हे प्रकरण प्रलंबित आहे. (हेही वाचा, पाच बायकांनी केला बलात्कार; पतीचा जागेवर मृत्यू)

दरम्यान, विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेचा कंडोम उत्पादक कंपन्यांनी गांभीर्याने विचार केला. त्यामुळे कंडोम उत्पादन करणाऱ्या काही कंपन्यांनी कंडोबसोबत पाकिटामध्ये प्लास्टीकच्या छोटय़ा पिशव्या देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कंडोम कसा वापरावा यासोबतच तो वापरुन झाल्यावर त्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबचा संदेशही कंडोमच्या पाकिटावर छापण्यात आला आहे.

अडॅ. असीम सरोदे यांनी बोधी रामटेके, ओमकार केणी, शुभम बिचे आणि वैष्णव इंगोले या विद्यार्थ्यांच्या वतीने अडॅ. असीम सरोदे आणि लॉयर्स फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्य आणि विधी महाविद्यालयाचे निखिल जोगळेकर यांच्या वतीने ही याचिका दाखल केली होती. वापरुन झालेला कंडोम हा अविघटनशील कचरा आहे हे मान्य करावे. तसे गृहीत धरावे. कंडोमचे विघटन कशाप्रकारे करावे याची माहिती कंडोम उत्पादक कंपन्यांनी त्यांचे उत्पादन असलेल्या कंडोमच्या पाकिटावर पाकिटावर छापावी तसेच, कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पाकिट द्यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.