आता व्हिसाशिवाय फिरू शकता हे सुंदर देश
इंडोनेशिया (Photo credit : The Jakarta Post

परदेशगमन ही प्रत्येक भारतीयाची इच्छा असते. अनके लोक परदेशात जाण्यासाठी कित्येक महिने तयारी करत असतात. हल्ली विमान प्रवासाचे दरही घटले असल्याने भारतात विमान प्रवास करणे सोपे झाले आहे. मात्र परदेशात प्रवास करण्यासाठी नशीब लागते असे म्हणतात. अनेकदा पासपोर्ट काढलेला असतो पण व्हिसा काढण्यासाठी येणारा खर्च , त्याचा ताण, व्हिसा मिळवण्याची किचकट प्रक्रिया यांमुळेदेखील परदेशवारीकडे दुर्लक्ष होते. व आपले परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल का नाही अशी भीती वाटायला लागते. म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवेश करू शकाल.

जगातील पॉवरफुल पासपोर्ट असणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा 63 वा क्रमांक लागतो. त्यामुळे परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही अतिशय चांगली संधी आहे. कारण या वर्षात भारतीय तब्बल 25 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकणार आहेत. चला पाहूया असे काही सुंदर देश जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करू शकता.

इंडोनेशिया

भारतीय नागरिक 30 दिवसांपर्यंत इंडोनेशियामध्ये व्हिसाशिवाय राहू शकतात. बाली हे जगप्रसिद्ध ठिकाण इंडोनेशियाचे प्रमुख आकर्षण आहे. इंडोनेशिया त्याचे नैसगिक सौंदर्य, सुंदर समुद्रकिनारे, बेटे, प्राचीन हिंदू मंदिरे, पारंपरिकनृत्य कला, दगड-लाकूड-धातूंवरची कलाकुसर यामुळे जगातल्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते.

भूतान

भारतीय पासपोर्ट असलेल्या प्रत्येकाला भूतानमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश दिला जातो. जगातल्या सर्वात सुखी देशांमध्ये भूतानची गणना होते. भूतानची राजधानी तिम्फू ही बौद्ध स्थळांसाठी फार प्रसिद्ध आहे. भूतानला ‘Land of Dragon’ म्हणतात, आनंदवन म्हणतात, हिमालयातील स्वप्ननगरीही संबोधले जाते.

मालदीव

बेटांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात भारतीय 90 दिवसांसाठी राहू शकतात. इथल्या सुंदर आणि दूरवर पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे 'हनिमून डेस्टिनेशन' म्हणून मालदीव प्रसिद्ध आहे.

मॉरिशस

हिंद महासागरात वसलेलं हे एक बेट. पोर्ट लुई हे मॉरिशसचं राजधानीचं शहर अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे. मॉरिशसमध्येही भारतीय पर्यटक 90 दिवसांसाठी राहू' शकतात. येथील समुद्रकिनारे अतिशय सुंदर असून बाजूला असणाऱ्या डोंगररांगांमुळे त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडते.

नेपाळ

ज्याप्रमाणे नेपाळी लोक भारतात मोकळेपणाने राहू शकतात. त्याचप्रमाणे भारतीयांनाही नेपाळमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे. इतर पर्यटन स्थळांबरोबरच माऊंट एव्हरेस्टमुळेही या देशाला पर्यटनाच्यादृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हाँगकाँग

हाँगकाँग हे शहर त्याच्या नितांत सुंदर आकाशासाठी ओळखलं जातं. इथे फिरण्यासाठी ओशियन पार्क, व्हिक्टोरिया पीक, लानताऊ आर्यलॅण्ड, पो लिन मोनेस्ट्री, क्लॉक टॉवर यासारखी ठिकाणं आहेत. इथे तुम्हाला प्रवेश केल्यावर तुमच्या पासपोर्टवर व्हिसा मिळतो. त्यामुळे तुम्ही इथे हवे तितके दिवस राहू शकता.

फिजी

हा देश म्हणजे एक बेटच आहे, जे पॅसिफिक समुद्रामध्ये वसलेलं आहे. नादी, सूवा लौटोका, लाबासा ही फिजीतली सुंदर शहरं पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र बनलेली आहेत. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही 4 महिने इथे राहू शकता.

कंबोडिया

दक्षिण पूर्व आशियामध्ये वसलेला हा देश आहे. सीम रोप, कोह रोंग आयर्लण्ड ही इथली प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. केवळ निसर्गसौंदर्यच नाही तर इथली बौद्ध मंदिरंही पाहण्यासारखी आहेत. इथे प्रवेश केल्यानंतर तुमच्या पासपोर्टवर तुम्हाला 30 दिवसांचा व्हिसा मिळतो.

थायलंड

थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातला एक देश पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. बँकाँक, पटाया यासारखी सुंदर शहरं पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहेत. शॉपिंग आणि बौद्ध संस्कृती ही थायलंडच्या पर्यटनाची खास वैशिष्ट्यं आहेत. भारतीय नागरिक दाखल होताच या देशाचा व्हिसा मिळतो. त्याची मुदत 15 दिवस असते.

मकाऊ

मकाऊ हा पीपल्स रिपब्लिक आॅफ चायनाचा भाग आहे. मकाऊ हे जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. इथले टॉवर, गॅलेक्सी मकाऊ ही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. इथलं सर्वांत महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इथले कॅसिनो. इथे तुम्ही 30 दिवस व्हिसा शिवाय राहू शकता.

जॉर्डन

बराचसा वाळवंटी असला तरी हिवाळ्यात बर्फाच्छादित शिखरे पाहायला मिळणाऱ्या जॉर्डनमध्ये भारतीय प्रवासी दाखल होताच व्हिसा मिळतो. 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी व्हिसा दिला जातो.