सरोगसी बिलः गर्भाशय विकता येणार नाही, पण भेट देता येईल!; जाणून घ्या सरोगसी म्हणजे नेमकं काय?
सरोगसी विधेयक संसदेत पारित | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरोगसी विधेयक (Surrogacy Bill) बुधवारी (19 डिसेंबर) पारित झाले. या विधेयकाअंतर्गत व्यावसायिक सरोगसी (Commercial Surrogacy) बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. कोणत्याही महिलेस आपल्या गर्भाशयाचा व्यावसायिक रुपात वापर करता येणार नाही. केवळ मदतीच्या भावनेने अत्यंत जवळच्या नात्यात केवळ भेट म्हणून सरोगसी करण्यास या विधेयकात सूट देण्यात आली आहे. या विधेयकानुसार समलैंगिक (Gay), एकेरी पालकत्व (Single parenting) आणि लिव्ह-इन पार्टनर्स (Live in Partners) व्यावसायिकरित्या भाड्याने गर्भाशय भाड्याने घेऊ शकत नाहीत. दरम्यान, एकेरी पालक असलेली व्यक्तीस सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील बनता येईल, यासाठी विधेयकात तरतूद असावी , अशी मागणी काही महिला खासदारांनी विधेयक पारित होताना केली.

एक तास चर्चेनंतर सरोगसी विधेयक सभागृहात पारित

द सरोगसी रेग्युलेशन बिल 2016 (The Surrogacy Regulation Bill 2016) वर लोकसभेत सुमारे एक तास चर्चा झाली. काँग्रेस आणि अण्णाद्रमुक खासदारांना विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप होता. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितले की, समाजातील विविध वर्ग, राजकीय पक्ष, सर्वोच्च न्यायालय आणि विधी आयोग यांनीही सरोगसीचा विरोध केला होता. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुनच सरोगसी विधेयक तयार करण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. भारत एक कमर्शिअली सरोगसी हब बनले आहे. सरोगसीच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकारच्या अत्याचाराची शिकार बनवले जाते. या सर्व प्रकारांना नव्या कायद्याने चाप लागेल असेही नड्डा यांनी या वेळी सांगितले.

राजकीय पक्षांची सरोगसी विधेयकावर विविध मते

दरम्यान, तृणमूर काँग्रेस खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की, समलैंगिक व्यक्तिलाही सरोगसीचा अधिकार मिळायला हवा. तसेच, केवळ फिगर बिघडण्याच्या कारणास्तव सेलिब्रेटींकडून करण्यात येणाऱ्या 'फॅशन सरोगसी'वरही बंधी घालण्यात यावी. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, सिंगल पॅरेंट्सना सोरगसीचा आधार घेता येईल अशी तरतूद विधेयकात असायला हवी. (हेही वाचा, 'विकी डोनर्स' सावधान! आता स्पर्म डोनेट केल्यास तुमची ओळख लपून राहणार नाही)

सरकारने हे विधेयक का आणले?

गेल्या काही वर्षांमध्ये 'सरोगसी हब' अशी भारताची ओळख निर्माण झाली होती. कारण, इथे कमी खर्चांमध्ये गर्भाशय भाड्याने मिळत होते. त्यासाठी ग्रामिण भागातील तसेच अदिवासी महिलांचे मोठ्या प्रमाणावर शोषन केले जात असे. श्रीमंत लोक अपत्य प्राप्तीच्या सुखासाठी सरोगसीचा आधार घेतात.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसीमध्ये तीन प्रकारचे लोक सहभागी असतात. काही जोडप्यांना काही कारणांमुळे अपत्य प्राप्ती होत नाही. ते आई-वडील होऊ शकत नाहीत. अशा वेळी ते कोणा तिसऱ्या महिलेची मदत घेतात. आयव्हीएफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पतीचे स्पर्म आणि पत्नीच्या एग्सपासून तयार करण्यात एलेले अँब्रियो तिसऱ्या महिलेच्या गर्भाशयात इंजेक्ट केले जातात. या महिलेने बाळाला जन्म दिला असला तरी, जन्माला येणाऱ्या बाळाचा डीएनए सरोगसी केलेल्या जोडप्याचा असतो.

जगभराच्या तुलनेत भारतात सरोगसी स्वस्त

एक असाही निष्कर्ष आहे की, श्रीमंत लोक आयव्हीएफ केंद्रांमधून 20 ते 50 लोख रुपये सरोगसीसाठी देत असतात. पण, प्रत्यक्ष ज्या महिला भाड्याने गर्भाशय देतात त्यांना केवळ 40 ते 50 हजार इतकीच रक्कम मिळते. भारतात जगभरातील देशांच्या तुलनेत सरोगसी अत्यंत स्वस्तात होते. भारतात तब्बल 2 हजार सरोगसी क्लनिक सुरु असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यूएस, इंग्लंड, नेपाळ, थायलंड आदी देशांमध्ये सरोगसी केव्हाचीच बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे.

कोणाला मिळणार नाही सरोगसीचा फायदा?

एकेरी पालक (सिंगल पॅरेंट्स), लिव्ह-इन कपल्स, होमोसेक्शुअल कपल्स, अविवाहीत कपल्स. विधेयकानुसार अशा प्रकारच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय सरोगसी मंडळ (नॅशनल सरोगसी बोर्ड) आणि राज्य सरोगसी मंडळ (स्टेट सरोगसी बोर्ड) निर्माण करण्यात येईल. याच्या माध्यमातून सरोगसी रेग्युलेट करण्यात येईल. ज्या जोडप्यांना आगोदरच अपत्य आहे ते सरोगसीचा आधार घेऊ शकत नाहीत. दरम्यान, अशा कपल्सना उपलब्ध असलेल्या एका वेगळ्या कायद्यानुसार अपत्य दत्तक घेता येऊ शकते.

कोणाला मिळणार सरोगसीचा फायदा?

  • काही कारणांमुळे जी जोडपी अपत्यास जन्म देऊ शकत नाहीत.
  • लग्नानंतर पाच वर्षे उलटूनही ज्या जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही अशी कपल्स
  • सरोगसी करण्यासाठी संबंधीत व्यक्ती सरोगेट मदरचा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक. एका स्त्रीला एकदाच सरोगेट मदर होता येऊ शकते
  • सरोगेट मदर आणि तिच्याकडून अपत्य प्राप्ती करुन घेणाऱ्या जोडप्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पात्रता प्रमाणपत्र घ्यावे लागणार.

सरोगसीचा आधार घेतलेली भारतीय जोडपी/ पालक

आमिर खान, शाहरुख खान, तुषार कपूर, करन जोहर, सनी लियॉन आदी मंडळींनी भारतात सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती केली आहे. दरम्यान, यात आमिर आणि शाहरुख यांना आगोदर अपत्ये होती. तर, तुषार कपूर आणि करन जोहर सरोगेट मदरच्या माध्यमातून सिंगल पॅरेंट बनले आहेत.