Veena Sendre: मादक डोळे, गुलाबी हसू, रॅम्पवॉक करणाऱ्या ट्रान्सजेंडरची अनोखी कहाणी, नाव आहे वीणा सेंद्रे
विणा सेंद्रे ((Photo Credit: facebook)

वीणा सेंद्रे (Veena Sendre), नाव तर ऐकले असेलच. जर ऐकले नसेल तर, लवकरच कळेल. ज्यांनी हे व्यक्तिमत्व पाहिले असेल, त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिल एक प्रतिमा. पाहताक्षणी लक्ष वेधून घेणारी. मादक डोळे, प्रसन्न चेहरा, पाहणाऱ्याचा कलेजा खलास करणारं गुलाबी हसू, आकर्षक शरीर आणि प्रभावी व्यक्तिमत्व, अशी ती प्रतिमा. खरे तर हे नाव अलिकडेच चर्चेत आले. या नावाने मॉडेलिंग क्षेत्रात छत्तीसगढचे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. वीणा सेंद्रे एक ट्रान्सजेंडर आहे. पण, केवळ ट्रान्सजेंडर इतकीच वीणाची ओळख नाही. 'मिस ट्रान्सक्विन इंडिया' स्पर्धेत ती छत्तीसगढचे प्रतिनिधित्व करत आहे. ट्रान्सजेंडर समूहातून ऑनलाईन मतदान प्रक्रियेद्वारा देशभरातून ब्यूटी क्विनची निवड होत आहे. या स्पर्धेत वीणा अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेत केवळ विणाच नव्हे तर, देशभरातील विविध राज्यातील ट्रान्सजेंडर्स सहभागी झाले आहेत.

काय आहे स्पर्धा

राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी ही स्पर्धा पीजेंट इंडियातर्फे आयोजित केली जाते. ट्रान्सजेंडर्स समूहाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर या स्पर्धेचा परीघ आणखी विस्तारला आहे. सांगितले जाते की, पूर्वी या स्पर्धेत थेट प्रवेश मिळत असे. पण, आता देशातील राज्यांमधून निवड होऊन या स्पर्धेत प्रवेश मिळतो. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्यावर वीणाने या स्पर्धेत प्रवेश केला. आता या स्पर्धेच्या माध्यमातून ती राष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण करु इच्छिते. येत्या ७ ऑक्टोबरला या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

विणा सेंद्रे ((Photo Credit: facebook)

निर्णय, मॉडेलींग, संघर्ष आणि आत्मविश्वास

आपल्या मॉडेलिंग प्रवासाबाबत वीणा सांगते, माझी शरीरयष्टी, कांती आणि चेहरा पाहून लोक माझे नेहमीच स्वागत करत. माझे शिक्षण फारसे झाले नाही. तसे पाहता शिक्षणात मन कधी फारसे रमलेच नाही. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात कायम होती. या जिद्दीतूनच मी मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. निर्णय तर घेतला. पण, माझी वाटचाल सोपी नव्हती. त्याची जाणीवही लवकरच झाली. अनेकदा फॅशन स्पर्धेसाठी माझी निवड व्हायची. मात्र, जेव्हा त्यांना कळायचे की, मी ट्रान्स वुमन आहे तेव्हा, मला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला जायचा. असे घडत होते. या प्रकाराचे मला वाईट जरुर वाटायचे. पण, मी कधी निराश झाले नाही. उलट तितक्याच त्वेशाने माझा आत्मविश्वास बाहेर यायचा. माझा स्वत:वर विश्वास होता. तसाच, माझ्या कर्तृत्वावरही.

विणा सेंद्रे ((Photo Credit: facebook)

घायाळ करणाऱ्या अदा

वेगवेगळ्या भागांमध्ये पार पडत असलेल्या या स्पर्धेसाठी वीणा छत्तीसगढमधून प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या प्रतिभासंपन्नतेने विणाने स्वकर्तृत्वाने या स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले आहे. वय वर्षे २४ असलेली वीणा मुळची रायपूरची. तिने मॉडेलींग आणि पर्सनालिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग पूर्ण केले आहे. वीणा जेव्हा रँपवर चालते तेव्हा तिच्या अदा पाहण्यासारख्या असतात. तिच्या अदांवर सोशल मीडियाही फिदा असतो. वीणा जेव्हा रॅम्पवर उतरते तेव्हा नजारा काही औरच असतो. पाहणारे थक्क होऊन जातात. या स्पर्धेत वीणाने अव्वल स्थान निर्माण केले आहे. पण, तिचा प्रवास पूर्ण झाला नाही. तिला अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. लवकर स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. अनेकांना विश्वास वाटतो की, या स्पर्धेत ती अंतिम विजेती ठरेल.

विणा सेंद्रे ((Photo Credit: facebook)

स्वत:पासूनच सामाजिक बदलाची सुरुवात

समाजातील लैंगिक भेदभावाबद्दलही वीणा सांगते. ती म्हणते, पूर्वीच्या तुलनेत आता काळ बराच बदलला आहे. समाजातील लैंगिक भेदभाव बराच कमी झाला आहे. तो पूर्ण संपला नाही. पण, त्याची तीव्रता जरुर कमी झाली आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तिकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. लोक त्यांच्याकडे सकारात्मक असल्याचे पाहायला मिळते. आता तर ट्रान्सजेंडर व्यक्तिला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे समाजात मोठा बदल पहायला मिळतो. ट्रान्सजेंडर समुहातील तरुण मंडळी प्रगती करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही मंडळी चांगले शिक्षण घेत आहे. यातील काही उच्च शिक्षितही आहेत. हे लोक करिअरसाठी चांगला पर्याय निवडताना दिसतात. माझा अनुभव विचाराल तर, माझे घर, परिसर, मित्र आणि समाजात ज्या ज्या ठिकाणी मी गेले तिथे माझ्यासोबत भेदभाव झाल्याचे मला आठवत नाही. मला वाटते ही वागणूक मिळण्याचे कारण माझा आत्मविश्वास आहे. सामाजिक बदल आपल्यापासूनच होतात. जर आपण बदललो तर समाज बदलतो.

विणा सेंद्रे ((Photo Credit: facebook)

सकारात्मक पाठिंब्याची गरज

वीणा सांगते, आत्मविश्वाच्या जोरावर मी काही करु पाहिलंआणि मी ते केलंही. पण, समाजात आज अनेक अशी मुले आहेत, ज्यांना त्यांच्या कुटुंबातून, समाजातून, मित्रपरिवारातून हवा तसा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे बिच्चाऱ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परिणामी त्यांच्या करिअरला बाधा येते. पण, मला वाटते समाजातील प्रत्येक व्यक्तिला, मनाप्रमाणे जगण्याचा, आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा, समाजात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. ज्या कुटुंबात अशी मुले जन्माला येतात त्या कुटुंबियांनी सर्वासामन्य मुलांप्रमाणे त्यांचाही स्वीकार करायला हवा.