मोदी सरकारला शिवसेनेचा धक्का; राफेल प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची खा. अरविंद सावंत यांची मागणी
राफेल डील:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राफेल मुद्द्यावरुन (Rafale Deal) सत्ताधारी भाजपला विरोधकांसोबतच मित्रपक्ष शिवसेनेनेही घेरल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाचा आजचा दिवस राफेल मुद्दावरुन जोरादर गाजला. राफेल मुद्दयावरुन काँग्रेस आणि विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेत जेपीसीची (JPC) मागणी केली. खासदार अरविंद सावंत यांनी राफेल मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका विस्ताराने मांडली. या वेळी अरविंद सावंत ( Arvind Sawant) यांनी राफेल प्रकरणाची चौकशी करण्यासीठी जेपीसी नेमावी आणि 'दूध का दूध, पाणी का पाणी' करवे अशी मागणी केली. या मागणीचे विरोधकांनीही जोरदार स्वागत केले.

राफेल प्रकरणाची चौकशी जेपीसीद्वारे करण्याची मागणी करत शिवसेना खासदार अरविंद सावंत लोकसभेत म्हणाले, 'राफेल हे कशा प्रकारचे ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट होते, ज्याची कोणतीही कंपनी नव्हती. जी कंपनी केवळ कागदावरच होती. जर केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे एचएएल जवळ सर्व काही होते तर, मग जेपीसीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यास सरकार का घाबरत आहे?'

दरम्यान, राफेल मुद्द्यावर लोकसभेत आज घमासान चर्चा झाली. राफेल प्रकरणाचा संबंध सरकार देशाच्या संरक्षणाशी जोडत आहे. तर, विरोधक चौकशीवरच अडून राहिले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही चर्चेदरम्यान आक्रमक भाषण केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाषणादरम्यान, राहुल गांधी यांनी आरोप केला की, राफेल व्यवहारात एचएएलला बाजूला ठेऊन सरकारने असंख्य तरुणांचा रोजगार हिरावून घेतला. पंतप्रधान मोदी यांनी पाठीमागच्या वेळी जोरदार भाषण केले. पण, त्यांनी राफेलवर कोणतेच भाष्य केले नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.