Telangana assembly elections 2018: तेलंगणामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार?
शिवसेनेचे 40 उमेदवार तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात (Archived, edited, symbolic images)

Telangana Assembly Elections 2018: महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष अशी असलेली ओळख राष्ट्रीय पक्षात बदलविण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून शिवसेना (Shiv Sena) गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर पडत देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका लढवत आहेत. सध्या सुरु असलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही (Telangana Assembly Elections 2018) शिवसेनेने आपले उमेदवार मैदानात उतरवले असून, जोरदार प्रचारही सुरु केला आहे. या आधी शिवसेनेने उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा अशा राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेनेला विजय मिळवता आला नाही. पण, पक्ष विस्तार मात्र करता आला.

४० मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकूण ४० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. या चाळीस मतदारसंघात शिवसेनेने प्रचाराची जोरदार आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, सर्व ठिकाणी मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे असा दावाही शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे. तेलंगणात 119 जागांसाठी निवडणूक होत आहे. 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कार्यक्रम

शिवसेना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार सर्व मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली, बैठका आणि विविध कार्यक्रम सुरु आहेत. शिवसेनेच्या रॅली आणि कार्यक्रमांना खास करुन तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकही शिवसेनेचे स्वागत करत आहेत, अशी माहिती शिवसेना नेत्यांनी दिली आहे. (हेही वाचा, जिंकण्यासाठी केला जातोय घुबडाचा वापर)

खा. अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची रॅली

दरम्यान, तेलंगणामध्ये शिवसेनेच्या उमेदावारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेतेही पोहोचले आहेत. उप्पल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार जगदीशभाई चौधरी यांच्या प्रचारासाठी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई उपस्थित राहिले. खा. देसाई यांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये रविवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रदेशाध्यक्ष टी. एन. मुरारी यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.