बहुजन वंचित आघाडी 48 जागांवर उमेदवार उभे करणार; काँग्रेससोबत आघाडी नाही: प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Election 2019:  अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करुनही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि पर्यायाने बहुजन वंचित आघडी ( Bahujan Vanchit Aghadi) यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी सोबत घेऊ शकली नाही. BVA (बहुजन वंचित आघाडी) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीच ही घोषणा केली. काँग्रेससोबत (Congress) असलेली संभाव्य आघाडी BVH तोडत आहे. येत्या 15 तारखेला राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, आता काँग्रेससोबत चर्चेचे सर्व पर्याय संपले आहेत. यापुढे काँग्रेससोबत या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे येत्या 15 तारखेला आम्ही राज्यातील सर्व ठिकाणी उमेदवार जाहीर करतो आहोत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासोबत आघाडी करणार काय? असे विचारले असता आमची लढाई भाजप आणि शिवसेनेशी आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, लोकसभा निवडणूक 2019: प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बहुजन वंचित आघाडीचे 4 उमेदवार घोषीत, बी जी कोळसे-पाटील निवडणुकीच्या मैदानात)

दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे लक्ष्मण माने यांनी म्हटले होते. आंबेडकर हे सोलापूर येथून लढल्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात. आंबेडकर यांच्या सोलापूर येथून लढण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. आंबेडकरांच्या सोलापूर येथील उमेदवारीबाबत विचारले असता, 'ते आता आमच्याच ज्येष्ठ नेत्याविरोधात उभा राहणार आहेत म्हटल्यावर आता काय बोलणार', अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खास. अशोक चव्हाण यांनी दिली होती.