Lok Sabha Election 2019: महाआघाडीत बिघाडी? काँग्रेसला वगळून सपा-बसपा येणार एकत्र?
सपा-काँग्रेस-बसपा | (Photo courtesy: Archived, Edited Images)

Lok Sabha Election 2019: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan)आणि छत्तीसगड (Chhattisgarh) या तीन राज्यांत विजय संपादन केल्यानंतर महाआघाडीतील दावेदारी अधिक भक्कम करण्याच्या काँग्रेसच्या स्वप्नांना धक्का बसण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि एनडीए विरोधातील सर्व घटक पक्षांची एक मजबूत आघाडी देशभरात उभी करण्यासाठी देशभरात हालचाली सुरु होत्या. दरम्यान, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा समाजवादी पक्ष (SP)आणि मायावती (Mayawati) यांचा बहुजन समाजवादी पक्ष (BSP) यांच्यात आघाडी (SP and BSP Alliance)होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगाडीत काँग्रेसला (Congress) वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे घडले तर, महाआगाडीची ट्रेन रुळावरुन खाली उतरायला वेळ लागणार नाही. असेही समजते आहे की, सपा, बसपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूलाही नक्की झाला आहे. तसेच, मायावती यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर या आघाडीची औपचारीक घोषणा करण्यात येईल.

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सपा-बसापासोबत उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला नक्की झाला आहे. या फॉर्म्यूल्यानुसार रायबरेली आणि अमेटी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात येणार आहे. तर, चौधरी अजीत सिंह यांच्या आरएलडी पक्षासाठी 2 ते 3 जागा सोडण्यात येतील. आरएलडीच्या खात्यात बागपत, मुजफ्फरनगर आणि कैराना मतदारसंघ येऊ शकतात.

सूत्रांनी असेही म्हटले आहे की, या दोन्ही पक्षांनी 80 लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार नक्की केले आहेत. एका फॉर्म्यूल्यानुसार बसपा 38 आणि सपा 37 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. तर, दुसऱ्या फॉर्म्यूल्यानुसार बसपा 39 आणि सपा 37 जागांवर निवडणूक मैदानात उतरतील. या दोन्ही फॉर्म्युल्यानुसार जागावाटप झाले तरी, आरएलडीसाठी 2 जागाच मिळू शकतात. या दोन्ही फॉर्म्यूल्यांवर दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची सहमती झाली आहे. (हेही वाचा, भाजपमध्ये खळबळ! मोदींना हटवा, गडकरींना पाठवा; शेतकरी नेत्याची आरएसएसकडे मागणी)

दरम्यान, काँग्रेसला घेऊन महाआघाडी करण्याबाबत सपा-बसपाची सध्यातरी इच्छा दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाचही राज्यात या दोन्ही पक्षांनी काँग्रेससोबत आघाडी केली नव्हती. मात्र, निवडणूक निकाल आल्यानंतर दोन्ही पक्षांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठींबा दिला आहे. दोन्ही पक्षांची युती झाली असताना काँग्रेसला एकट्याने मैदानात उतरणे काहीसे कठीण जाणार आहे. मात्र, काही झाले तरी, दोन्ही पक्ष अमेटी, रायबरेली या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उतरवणार नाहीत. तसेच, सपा आपल्या कोट्यातून काही छोट्या मित्रपक्षांनाही काही जागा सोडण्याची शक्यता आहे. जसे की, निषाद पार्टी, पीस पार्टी वैगेरे.