भाजप नेत्याच्या घरावर छापा टाकून 17 बॉम्बसह, 116 काडतुसे जप्त; मोठे षडयंत्र आखण्याचा डाव उधळला
पोलिसांनी जप्त केलेला शस्त्रसाठा (Photo Credit : Twitter)

अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. आचारसंहितेचे पालन होताना दिसत आहे, तसेच देशात अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. काल मध्यप्रदेशातील भाजप नेते संजय यादव (Sanjay Yadav) यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 13 पिस्तुल आणि 116 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी पोलीस अधिक्षक यांगचेन डी भूटिया यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

सेंधवा शहरात संजय यादव आणि गोपाळ जोशी यांच्या टोळ्या सक्रीय आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या टोळ्या मोठे षडयंत्र आखत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी संजय यादव विरोधात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे, तसेच गोपाळ जोशी याच्याविरोधाताही गुन्ह्याची नोंद झाली आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. (हेही वाचा: गोकूळ दूध संघावर आयकर विभागाचा छापा, सहकार क्षेत्रात खळबळ)

या दोन्ही आरोपींच्या विरोधात आधीच खंडणी, मारहाण, हत्या, धमकावणे यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. संजय यादवच्या विरोधात 47 गुन्हे तर गोपाळ जोशीवर 30 गुन्ह्यांची नोंद आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 करोड रुपयांची दारु, ड्रग्स, बनावटे वाहने आणि हत्यारे जप्त केली आहेत. यामध्ये इतर अनेक लोक सामील असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त करून दाखवली आहे.