पेट्रोल, डिझेल दरात वर्षभरातील दिसालासादायक घसरण; देशातील प्रमुख शहरांतील इंधनदर सत्तरीत
वर्षाखेरीस पेट्रोल-डिझेल दरात दिलासादायक घसरण | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

सरकारने अनेकदा अश्वासन देऊनही सरते वर्ष हे सर्वसामान्यांसाठी 'अच्छे दिन' (Achhe Din) दाखवणारे ठरलेच नाही. बेकारी, वाढती महागाई, नोटबंदी, जीएसटी अशा एक ना अनेक गोष्टींची झळ जनतेला बसली. त्यात प्रामुख्याने पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांना प्रचंड हैराण केले. एक क्षण तर असा आला की इंधन दर आता शंभरीपार जातात की काय अशी भीती वाटू लागली. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देताना पेट्रोल व डिझेलच्या दरांनी देशभरातील नागरिकांना दिलासा दिल्याचे चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंधन दरात दिलासादायक कपात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल दराने मंगळवारी (25 डिसेंबर) सुरु वर्षातील नीचांकी पातळी गाठली. मुंबईत मंगळवारी पेट्रोल दर (Petrol Price) प्रतिलिटर ७५.४१ तर, डिझेल दर (Diesel Price) प्रतिलिटर ६६.७९ रुपये इतका पाहायला मिळाला.

देशातील प्रमुख शहरांमधील इंधनदर प्रतिलिटरमध्ये (*दरांचे आकडे 25 डिसेंबरच्या आकडेवारीप्रमाणे)

मुंबई: पेट्रोल-७५.४१ रुपये, डिझेल- ६६.७९ रुपये

नवी दिल्ली: पेट्रोल-६९.७९ रुपये, डिझेल- ६३.८३ रुपये

कोलकाता: पेट्रोल- ७१.८९ रुपये, डिझेल- ६५.५९ रुपये

चेन्नई: पेट्रोल- ७२.४१ रुपये, डिझेल- ६७.३८ रुपये

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा इंधन दरात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याचा परिणाम भारतासारख्या देशाना झाला. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सोमवारी पेट्रोल, डिझेल दरात अनुक्रमे २१ व १९ पैशांची कपात करण्यात आली. हेच चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. मंगळवारीही ही कपात आणखी सात पैशांनी करण्यात आली. त्यामुळे देशातील इंधनदर बरेच कमी झाले. (हेही वाचा, 'पेट्रोल, डिझेलची महागाई, जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय?')

दरम्यान, इंधन दरात होणाऱ्या चढ उताराचे थेट पडसाद सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात. त्यामुळे तेल दरात काय बदल होतो याकडे सर्वसामान्य जनतेचे बारीक लक्ष असते. तेल दरात वाढ झाल्यास जनतेची नाराजी वाढते. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण होतो. ही नाराजी वाढू द्यायची नसेल तर, इंधन दर नेहमी नियंत्रणात ठेवण्याकडे सरकारचा कल नेहमीच राहतो.