मोदींनी राफेल डीलवर फक्त 15 मिनिटे माझ्यासोबत चर्चा करावी- राहुल गांधींचे थेट आव्हान
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI)

छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप सरकारवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी (Rahul Gandhi) जोरदार टीका केली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर फक्त टीकाच केली नाही तर राफेल डीलवर माझ्याशी फक्त 15 मिनिटे चर्चा करावी, असे थेट आव्हानही केले.

अंबिकापूर येथील रॅलीदरम्यान पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "मी नरेंद्र मोदींना आव्हान देतो की फक्त 15 मिनिटे राफेलबद्दल माझ्याशी चर्चा करावी. मी अनिल अंबानी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेल्या विधानांबद्दल बोलणार आहे. मोदींनी राफेल डीलमध्ये घोटाळा केल्याचे सुरक्षा मंत्रालयाने सांगितले आहेच. मोदींनी 526 कोटींचे विमान 1600 कोटींना खरेदी केले. मोदींनी कोणत्याही कायद्याचे पालन केलेले नाही. त्यामुळे ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत."

काँग्रेसची सत्ता आल्यानंतर छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिले. तसंच गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. त्यामुळे निवडणूकीनंतर शेतकऱ्यांना बोनस देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काळ्या पैशांच्या मुद्दयावरुन मोदींवर टीकास्त्र

नोटबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे पैसे सूटबूट वाल्या मित्रांमध्ये वाटले आणि तो शेतकऱ्यांचा काळा पैसा असल्याचे सांगितले. यावर राहुल गांधी म्हणाले की, "शेतकऱ्यांचा काळे पैसा असे बोलून मोदींनी अन्नदात्यांचा अपमान केला आहे."