PUBG: बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने पबजीवर बंदी घाला, विद्यार्थी संघटनेची मागणी
PUBG Game (Photo Credits: Twitter)

PUBG: भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तसेच पबजी खेळणारी मुले सध्या अभ्यासात अजिबात लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच बोर्डाच्या परिक्षा तोंडावर येऊन थांबल्या आहेत. त्यामुळेच जम्मू-काश्मीर मधील विद्यार्थी संघटनेने पबजी गेमवर बंदी घालण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे पबजी खेळावर बंदी न घातल्यास कित्येक मुले नापास होण्याची शक्यता असल्याचे विद्यार्थी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे ही मागणी केली आहे. तसेच पबजी गेममुळे मुलांचे भविष्य बिघडत असल्याने तात्काळ परीक्षेच्या काळात या गेमवर बंदी घालावी असे संघटनेकडून सांगितले जात आहे.

तर काही दिवसांपूर्वी एका जीम ट्रेनरने सातत्याने 10 दिवस पबजी खेळल्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच पबजी गेम ड्रग्जपेक्षा भयंकर असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी राज्यपालांनी पबजीवर बंदी घाला असे संघटनेचे उपाध्यक्ष राफीक मखदुमी यांनी सांगितले आहे.