दिल्ली ठरली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी; टॉप 10 मध्ये भारतातील 7 शहरे
दिल्ली: सर्वात प्रदूषित राजधानी (Photo Credit: IANS)

नुकतेच 'आयक्यू एअर' (IQAir) आणि 'ग्रीनपीस' (Greenpeace) या संस्थांच्या संयुक्त संशोधनातून जगातील प्रदूषित शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये ‘दिल्ली’ (Delhi) ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरली आहे. ग्रीनपीसने जगातील सर्वात प्रदूषित अशा 62 शहरांची नावे जाहीर केली आहेत, यामध्ये हरियानामधील गुरूग्राम (Gurugram) हे सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. पहिल्या 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 7 तर पाकिस्तानातील 2 शहरे आहेत. या यादीत तीन राजधान्यांचा समावेश आहे, पहिली आहे भारताची राजधानी दिल्ली, दुसरी राजधानी ढाका आणि अफगाणिस्तानची राजधानी काबुल तिसऱ्या क्रमांकांवर आहे.

या प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर गुरूग्राम, दुसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचे शहर फैसलाबाद आहे. चौथा क्रमांक हरियाणाच्या फरीदाबादला, पाचवा राजस्थानच्या भिवडी शहराला आणि सहावा नोएडाला मिळाला आहे. अहवालात म्हटले आहे की, फरिदाबादमध्ये पीएम 2.5 वरून वाढून 129.1 इतका झाला आहे, भिवडीमध्ये 125.4 आणि नोएडामध्ये 123.6 मायक्रोग्राम / क्यूबिक मीटर इतकी नोंद झाली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील तब्बल 17 शहरे प्रदूषित; तातडीने उपाययोजना करण्याची सूचना)

या अहवालात समाविष्ट असणाऱ्या 3000 शहरांच्या पीएम 2.5 डेटाकडे पाहताना दिसून येते की, जगभरातील लोकांचे आरोग्य वायू प्रदूषणामुळे किती मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. सध्या संपूर्ण जग ही वायुप्रदूषणाची समस्या सोडवत आहे, भारतही विविध पातळ्यांवर अनेक योजना राबवत प्रदूषणाचा सामना करत आहे. मात्र जगातील सर्वात प्रदूषित 20 शहरांमधील तब्बल 15 शहरे ही भारतातील आहे अत्यंत खेदजनक आहे.

टॉप 10 मध्ये भारतातील 7 शहरे

  1. गुड़गांव (हरियाणा)- 135.8
  2. गाझियाबाद (उत्तर प्रदेश)- 135.2
  3. फैसलाबाद (पाक)- 130.4
  4. फरीदाबाद (हरियाणा)- 12 9.1
  5. भिवाडी (राजस्थान)- 125.4
  6. नोएडा (उत्तर प्रदेश)- 123.6
  7. पटना (बिहार)- 11 9.7
  8. होतान (चीन)- 116.0
  9. लखनऊ (उत्तर प्रदेश)- 115.7
  10. लाहोर (पाक)- 114.7