Pulwama Terror Attack: खबरदारी घेतली नाही; दहशतवादी हल्ल्यापूर्वी गुप्तहेर विभागाने दिला होता हा इशारा
पुलवामा हल्ला (Photo Credit- Twitter)

काल दुपारी लष्करावर देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला, तब्बल 44 जवान या हल्यात शहिद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा हल्ला झाला. या ताफ्यामध्ये एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी लोकांपर्यंत तळागाळातून याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. जागोजागी सुरक्षा तैनात असताना हा हल्ला झालाच कसा याचा शोध संरक्षण विभाग घेत आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारीलाच गुप्तचर संस्थांकडून IED हल्ला होण्यासंदर्भात अ‍ॅलर्ट जारी केला होता, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

परिसराची योग्य रितीने तपासणी केल्याशिवाय जवानांचा ताफा पुढील मार्गाच्या दिशेने जाऊ देऊ नका, अशी स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली होती. गुप्तचर विभागाने जारी करण्यात आलेल्या पत्रकात 9 फेब्रुवारीचा दिवस सर्वांधिक धोकादायक असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी या भागात मोठी बर्फवृष्टी होत होती, सर्व मार्ग बंद होते. मात्र जेव्हा मार्ग खुले झाले तेव्हा हा जवानांचा ताफा पुढे पाठवण्यात आला. मात्र यावेळी गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (हेही वाचा :  दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?)

जैश-ए-महम्मद या संघटनेने स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळली. तब्बल 10 किलोमीटरपर्यंत या स्फोटाचा आवाज गेला होता. दहशतवादी संघटनेचा एक कमांडर आदिल अहमद दार याने हे कृत्य घडवून आणले. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. गेल्या वर्षी 9 डिसेंबरला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता.