Thackeray Trailer : 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; बाळासाहेबांची जीवनगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर  (Video)
ठाकरे चित्रपट (Photo credit : youtube)

Thackeray Trailer : शेवटी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ठाकरे’ (Thackeray) या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'महाराष्ट्राचा वाघ' अशी ओळख असलेले बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) भारतीय राजकारणातील एक बडी आसामी. आज इतक्या वर्षांनंतरही बाळासाहेबांच्या फक्त नावावर मुंबई चालते. अशा बाळासाहेबांचे जीवनचरित्र या ‘ठाकरे’ चित्रपटाच्या माध्यमातून ऊलगडणार आहे. आज, 26 डिसेंबर रोजी कार्निव्हल आयमॅक्स वडाळा येथे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ट्रेलर प्रदर्शनाचा शानदार सोहळा पार पडला.

ठाकरे हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ट्रेलरमधील तीन संवाद आणि काही प्रसंगांवर सेन्सॉरने आक्षेप घेतला होता. मात्र सेन्स़ॉरने आक्षेप घेतला तरी हा ट्रेलर ठरल्या वेळेत प्रदर्शित होईल ही भूमिका राऊत यांनी घेतली होती, आणि शेवटी ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच याला तुफान प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता या चित्रपटाचा मराठी ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी वापरण्यात आला आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या दंग्यांपासून ट्रेलरची सुरुवात होते. अशा वेळी मुंबईला शांत करण्यासाठी एकाच व्यक्तीचे नाव पुढे येते ते म्हणजे 'बाळासाहेब ठाकरे'. बाळासाहेबांच्या पक्ष स्थापनेपासूनचा प्रवास या ट्रेलरमध्ये दिसतो. कसदार अभिनय, धारधार संवाद, काळजाचा ठाव घेणारी भाषणे, उत्कृष्ट छायाचित्रण, नजर हलणार नाही असे दिग्दर्शन या सर्व गोष्टींनी हा ट्रेलर सजला आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. तर अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 23 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.