..आणि सुलोचना चव्हाण यांना अवघा महाराष्ट्र 'लावणीसम्राज्ञी' म्हणू लागला
Lavani Samradni Sulochana Chavan | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Happy birthday Sulochana Chavan: सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उमटतो तो लावणीचा ठेका आणि कानावर पडते ढोलकीची थाप. क्षणात घुंगराचा छमछमाट होतो आणि लावणीचे शब्द ठसक्यात काळजात घुसतात. लावणी गायन प्रकाराला एक वेगळा आयाम प्राप्त करुन देणारा आवाज म्हणजे लावणीसम्राज्ञी (Lavani Samradni) सुलोचना चव्हाण. लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण या जगभरातील रसिकांना माहिती असल्या तरी, त्यांनी इतर प्रकारातील गाणीही गायली आहेत. त्यांनी गायलेल्या सर्वच गाण्यांचे रसिकांनी स्वागत केले. पण, भरभरून दाद दिली ती लावणीलाच. सुलोचनाबाईंनी गायलेल्या लोवण्यांपैकी लोकप्रिय लावण्यांची यादी करायला बसलो तर, सर्वच लावण्यांची दखल घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकणार नाही. मराठी रसिकाला आपल्या आवाजाने घायाळ करणाऱ्या या लावणीसम्राज्ञीचा आज वाढदिवस. सुलोचना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्या लावणी आणि एकूण कारकिर्दीवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.

चव्हाण हे सुलोचनाबाईंचं लग्नानंतरचं आडनाव. त्यांचे माहेरकडील आडनाव कदम. लग्नानंतर त्यांनी सुलोचना चव्हाण हेच नाव घेतलं आणि त्याच नावाने त्या प्रसिद्धही झाल्या. त्यांचा जन्म १७ मार्च १९३३ रोजी मुंबई येथे झाला. सुलोचना बाईंच्या लहानपनी त्यांच्या घरात एक मेळा भरत असे. "श्रीकृष्ण बाळमेळा" असे त्याचे नाव. या मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी कलाक्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. पुढे ते पाऊल अधिकच भक्कम झाले. सुरुवातीला मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. यात त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती यांसारख्या काही भाषांमध्ये कामे केली. पण, त्यांचा खरा ओढा होता गायनाकडे. त्यांच्या मोठ्या बहिणीचा त्यांच्यावर विशेष जीव. त्यामुळे त्यांनीही सुलोचनाबाईंनी गायनात स्वत:ला झोकून द्यावे यासाठी पाठीशी भक्कम आधार दिला.

सुलोचना चव्हाण यांचे वैशिष्ट्य असे की, सुलोचना बाईंनी शास्त्रीय संगीताचे कोणत्याही प्रकारे शिक्षण घेतले नाही. तरीही त्यांनी आपल्या गायनाची विशिष्ट शैली निर्माण केली. त्या काळात ग्रामोफोन असायचे. ग्रामोफोनवर गीत, संगीत ऐकूण त्या रियाज करत असत. कष्टातून त्यांनी गायनासाठी आवश्यक असा गळा तयार केला. जो त्यांना आयुष्यभराची साथ देता झाला.

सुलोचना चव्हाण यांची चित्रपट गायनाची सुरुवात हिंदीमधून झाली. 'कृष्ण सुदामा' या हिंदी चित्रपटातून त्यांनी पहिले गाणे गायले. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. पुढे अनेक संगितकार त्यांच्या आवाजाचे चाहते झाले. त्यांनी सी. रामचंद्र, मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त या त्याकाळच्या आघाडीच्या गायकांबरोबर गाणी गायली. त्यांनी मराठीत लावणी आणि इतर गाणी गायलीच परंतू मराठीव्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले. कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेताही ही मुलगी इतके अप्रतीम गाते हे पाहून स्वत: बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. बेगम अख्तर यांनी त्यांच्या गायनाचे तोंड भरुन कौतुक केल्याची आठवणही सुलोचनाबाईंनी एका कार्यक्रमात सांगितले. (हेही वाचा, खाशाबा जाधव: हुकणाऱ्या सामन्यात दाखवला डाव; ऑलिम्पिकमध्ये पदकावर कोरले नाव)

सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या सर्वच लावण्या प्रचंड गाजल्या, त्यापैकी या काही..

१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची

२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं

३. पाडाला पिकलाय आंबा

४. फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा

५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा

६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा

७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?

८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष

९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याचं

१०. मल्हारी देव मल्हारी

११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी

१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा

१३. गोरा चंद्र डागला

१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना

१५. पावना पुण्याचा आलाय गं

सुलोचणा चव्हाण यांनी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात पहिली लावणी गायली. या लावणीपासूनच त्यांनी लवणी गायनास सुरुवात केली. या लावणीत अनेक दिग्गजांचा समावेश होता. चित्रपट "हीच माझी लक्ष्मी" लावणीचे बोल होते "मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी...", लावणी चित्रीत झाली होती प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्यावर आणि लावणीला संगीत दिले होते वसंत देसाई यांनी. ही लावणी गायल्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुलोचनाबाईंना "लावणीसम्राज्ञी" असा किताब दिला. तेव्हापासून आजवर सुलोचनाबाईंच्या नावाआधी 'लावणीसम्राज्ञी' असा उल्लेख केला जातो. साधारण 1953-54 या वर्षात आलेल्या 'कलगीतुरा' या चित्रपटाचे दिग्दर्शक एस चव्हाण यांच्यासोबत सुलोचना चव्हाण यांचे लग्न झाले. विवाहानंतर मूळच्या कदम असलेल्या सुलोचनाबाई या सुलोचना चव्हाण झाल्या.