जगातील सर्वात अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक लॉंंच; पाहा काय आहेत फीचर्स
आर्क व्हेक्टर (Photo credit : Instagram)

इटलीच्या मिलान शहरात चालू असलेल्या EICMA 2018 मध्ये, ब्रिटीश ऑटो कंपनी आर्क व्हेहिकल्सने आपल्या नवीन इलेक्ट्रिक बाइक 'आर्क व्हेक्टर’ (arc vector)ला सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही जगातील सर्वात जास्त प्रीमियम आणि अॅडव्हान्स इलेक्ट्रिक बाइक आहे. या बाइकची किंमत 85 लाख रुपये आहे. तर चला पाहूया नक्की काय आहे ही, आधुनिक इलेक्ट्रिक बाइक.

कंपनीच्या मते, आर्क व्हेक्टर मॉडेल हे जगातील सर्वात जास्त प्रिमियम, अॅडव्हान्सड इलेक्ट्रिक बाइक आहे, ज्यात वापरली गेलेली samsung ची 16.8 kWH बॅटरी केवळ 30 मिनिटांमध्ये पूर्णतः चार्ज होते. पूर्ण चार्ज झालेली ही बाइक 225 माइल्स प्रवास करण्यास सक्षम आहे.

85 लाख रुपये किमतीची ही बाइक केवळ 3.1 सेकंदात 0-60 mph इतक्या वेगाने धावणार आहे. या बाइकचा  टॉप स्पीड 120 mph इतका आहे. ही बाइक पूर्णपणे हँडमेड असून, या बाइकची बॉडी कार्बन फायबरने बनवली आहे. या बाइकचे वजन केवळ 220 किलो असून, यात कार्बन फायबल स्विंगआर्म्स, कस्टम ऑहिलिन्स डम्पर्स, ब्रॅबो ब्रेक सिस्टम आणि युनिक आर्क बॅटरिज वापरल्या आहेत.

या बाइकसोबत हॅप्टीक जॅकेट आणि HUD हेल्मेटसुद्धा देण्यात आले आहे. या हेल्मेटद्वारे तुम्ही wi-fi देखील वापरू शकणार आहात. त्याचबरोबर या हेल्मेटमध्ये रिअर व्हिजन प्रणाली आहे, जी हेलमेटमध्ये लावण्यात आलेल्या लहान स्क्रीनवर रिअर व्ह्यू डिस्प्ले करेल. त्याचबरोबर या स्क्रीनवर बाइकचा स्पीड आणि बाइकची इतर माहिती देखील दिसू शकते.

बाइकसोबत मिळणारे ऑरिजिन जॅकेटदेखील खूप खास आहे. जॅकेट पूर्णतः इलेक्ट्रिकली कनेक्ट केलेले आहे. जे तीन प्रकारे कार्य करेल. यातील पहिला मोड आहे अर्बन मोड, यामध्ये जॅकेट परिधान करणाऱ्याला  त्याच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये इतर कोणती वाहने चालली आहेत त्याबद्दल हे जॅकेट माहिती सांगेल. दुसरा मोड आहे स्पोर्ट्स मोड, यामध्ये जॅकेट बाइकच्या डायनामिक पोझिशनबद्दल चालकाला माहिती देईल. तिसरा मोड आहे euphoric मोड, ज्यात या जॅकेटकडून चालकाला हेल्मेट आणि बाइकची माहिती दिली जाते.